हॅबिटॅट

सातवी-आठवीत शाळेत असताना सेमी-इंग्लीश माध्यम घेतले होते, सायन्समधे ’हॅबिटॅट’ची व्याख्या इंग्लीशमधुन पाठ केली होती. थोडक्यात त्याचा अर्थ असा होता कि, प्राणी, पक्षी – सजीव हे त्यांना अनुकुल असलेल्या ठिकाणी राहतात. ह्यात विषेश काय? शाळेत जाण्यार्‍या मुलांची परीस्थिती पाहता अशा व्याख्या फक्त परीक्षेपुरती मर्यादीत असतात. ह्या गोष्टीची व्याप्ती किती असेल असा विचारही कधी आपल्या डोक्यात येत नाही. आजच्या इलेक्ट्रोनिक वस्तुंच्या, टीव्ही आणि इंटरनेटच्या जगात ज्या ठिकाणी नेटवर्क कवरेज मिळेल ते ठिकाण माणसाचे हॅबिटॅट!

***

पहिल्या मजल्यावर असलेल्या माझ्या घराच्या बाल्कनीत उभे थांबल्यास समोर जांभळाचे झाड आहे. बर्‍याच वर्षांपुर्वी एका मौसमात त्या झाडावर कावळ्याने घरटे बांधले होते. मस्ती म्हणुन एकदा त्या कावळ्याच्या दिशेने मी कागदाचा बोळा फेकला. एक-दोन दिवस उगाचच त्रास देत होतो त्याला. तो कावळा चिडायचा. पिसे फ़ुगवुन स्वत:चा आकार मोठा करयचा. आवाज बदलुन विचित्रपणे काव-काव करयचा. नंतर मात्र त्याने संयम सोडुन हल्ला चढवण्यास सुरुवात केली. दुरुन कुठुन तरी उडत यायचा आणि माझ्या डोक्यावर पाय मारुन जायचा. असे झाल्यावर मी त्याचा नाद सोडुन दिला. थोडक्यात त्याने स्वत:चे घर आणि परीसर सुरक्षीत केला. कावळ्याने स्वत: त्याचे ’हॅबिटॅट’ सुरक्षीत ठेवले.

***

सकाळी सुर्योदयापुर्वीच होटेलवरुन निघालो. अंधारात झोपलेल्या गावातुन गाडी वेगाने सरोवरापाशी पोहोचली. गोल वळसा घालुन पश्चिम दिशेला थांबलो आणि पुर्वेकडे पाहत आम्ही पाच जण स्वतंत्रपणे जागा निवडुन बसलो. मी निवांतपणे बसलो, अंधारात  समोरच्या अस्पष्ट पण भव्य जाणवणार्‍या सरोवराकडे पाहत. माझ्यासाठी सरोवर पुर्ण अनोळखी असले तरी त्याबद्दल थोडी आपुलकी होती. नीरव शातंता. हवेत चांगलाच गारवा होता. काही वेळाने सरोवरातल्या झाडांमधे कुजबुज चालु झाली. पंखांची फडफड, हलकासा चिवचिवाट. प्रकाश जसा वाढेल त्याप्रमाणे शांतता, गारवा आणि अंधार एकामागुन एक निघुन चालले होते. त्याचप्रमाणे सरोवरात राहणार्‍यानी झोप संपवुन, नवीन दिवसाची सुरुवात केली होती. जसा मला क्षीतीजावर सुर्यबिंब दिसला तसा सरोवरातुन पक्षांच्या थव्याने आकाशात झेप घेतली. मोर, किंगफिशर आणि इतर पक्षांनीही दर्शन दिले.

इतके दिवस फक्त फोटोत पाहिलेल्या आणि गप्पांमधुन ऐकलेल्या, वाचलेल्या सरोवरला गेल्या एक तासापासुन मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. हिरव्या पाण्यात सुर्याचे प्रतिबिंब दिसले. सोबत असलेल्य़ांची फोटोग्राफी संपल्यावर आम्ही तिथुन निघालो.

दैत्यसुदान मंदिर

दैत्यसुदान मंदिर

दुपारी कडक ऊन पडले होते. गावातील प्राचीन मंदिर बघायला गेलो. मंदिरातील बराचश्या भागात काळोख होता. प्रवेशद्वारातुन आलेला प्रकाश थेट गर्भगृहात येत असल्याने पांढरेशुभ्र वस्त्र चढवलेली काळ्या पाषाणात घडवलेल्या विष्णुच्या मूर्ती उठुन दिसली. दर्शन घेऊन बाहेर आलो. मंदिरासमोरच्या पायर्‍यांच्या दगडावर अप्रतीम नक्षीकाम आहे. मंदिराला प्रदक्षीणा घालताना खांबावर कोरीवकाम बघण्यात दंग झालो. पुराण काळातील कथा मूर्तींच्या स्वरुपात कोरलेल्या होत्या. उगाचच वाटले की हे प्राचीन शिल्पकलेचे ज्ञान/शिक्षण कुठे गेले? या ज्ञानाच्या ’हॅबिटॅट’ला धक्का का बसला? हा विचार मनात आला… प्रदक्षीणा संपायला आली तोच दोन तरुण मंदिराच्याच सावलीत सिगारेट ओढत बसलेले दिसले…

संध्याकाळी चारच्या सुमारास सरोवरात उतरायला सुरुवात केली. एखाद्या गडावरुन खाली उतरताना कसे वाटतेना, तसे वाटले. सरोवरातील पाण्याच्या आजुबाजुस छोटी-छोटी झाडे दिसत होती, सकाळी गप्पांमधे सगळे त्याला जंगल म्हणत होते. तेव्हा या झुडुपांना का जंगल म्हणताय असे वाटले होते. त्याचे खरे उत्तर सरोवरात उतरल्यावर कळाले. नाना प्रकारची उंच झाडे होती. त्यावर माकडे खेळत होती. कडक उन्हाळा असला तरी पाऊलवाटेवर थंड, गडद सावली होती. थोड्यावेळाने काळ्या दगडातील “रामगया” मदिर लागले. सहाव्या ते दहाव्या शतकांच्या दरम्यान कधीतरी बांधण्यात आलेल्या अनेक मदिरांपैकी एक हे मंदिर. अशी अनेक मंदिरे आणि त्याची भग्न अवषेश सरोवरात आहेत. डाव्या हाताच्या बाजुने चालत पुढे सरकलो. झाडे ओलांडुन मोकळया भागात पाण्यापाशी आलो. खरोखर एका मोठ्या खड्ड्यात उभे राहिल्यासारखे वाटले. समोर पाणी आणि सर्व बाजुने डोंगरकड्यासारखी कड. पाण्याचा उग्र दर्प जाणवला. मातीवर – चिखलावर, आजुबाजुच्या दगडांवर, मंदिरांच्या भग्न अवषेशांवर, सगळेकडे पांढरा ’लेयर’ होता. पाण्यात बदकांसारख्या पक्षांचा थवा होता, आम्हाला बघुन उडुन गेला. पाणी हिरवे का दिसत होते हेही कळाले – पाण्यात शैवाल वनस्पति होत्या. पुण्यात अभ्यास करणार्‍या संस्थांना देण्यासाठी बाटलीभर पाणी भरुन घेतले. सुकलेल्या चिखलावरुन चालत पुढे जात राहिलो. चालताना बर्‍याच गोष्टींची निरिक्षणे झाली. पाण्यालगतच्या मोकळ्या भागात चिखल सुकला होता, पांढरा लेयर झाडांपर्यंत होता –  म्हणजे पाणी आटले होते. चिखलात चपला, बाटल्या, प्लॅस्टिक, कंगवा, बांगड्या होत्या. काही ठिकाणी कोळीने बनवलेली जाळी बघायला मिळाली.

3

कळमजा देवीच्या मंदिरापाशी आलो तेव्हा सुर्यास्ताची वेळ झाली असावी. कारण सरोवरातील राहणार्‍याचा दिवस संपत आला होता याची चिन्हे दिसत होती. पक्षांचा चिवचिवाट बराच वाढला होता. पोपट, साळुंखी, खारुताई घरी परतताना दिसले. आम्ही चौघानी बसुन प्रवासासाठी आणलेला नाष्टा संपवला. सोबतचे पाणी पिऊन आलो त्याच वाटेने परतण्यास निघालो. पुर्ण अंधार पडला होता. आकाशात चंद्र असुनही त्याचा प्रकाश सरोवराच्या जंगलात फायद्याचा ठरत नव्हता. खाली पाला-पाचोळ्यात थोडी जरी चुळबुळ झाली तरी दचकायला होत होते. मोबाईलच्या प्रकाशात आणि भुतांच्या गप्पांत पायवाट सोडुन वर जाणारा रस्ता पकडला. वर येईपर्यंत सरोवर पुन्हा एकदा शांत झाले होते. किती भारी आहे सरोवरातल्या प्राण्यांचे, पक्षांचे, सुक्ष्मजीवांचे ’हॅबिटॅट’!

***

लोणार सरोवर

१८०० मीटर व्यास असलेल्या हा खड्डा ५०,००० वर्षांपुर्वी एका अशनीपातामुळे निर्माण झाला. या खड्ड्यात खार्‍या पाण्याचे सरोवर आहे. हे ठिकाण अगणित सजीवांचे ’हॅबिटॅट’ आहे! सरोवर आणि आजुबाजुचा परीसर वैशिष्ट्यांनी खचाखच भरलेला आहे. येथील मायक्रो-इको सिस्टीम, किटक, खडक, प्राणी यांचा अभ्यास करण्यास हौशी, विद्यार्थी आणि देशा-परदेशातील वैज्ञानिक भेट देत असतात. त्यामुळेच मागच्या काही वर्षातल्या निरीक्षणात आढळुन गोष्टींमुळे या अद्वितीय ’हॅबिटॅट’ला मोठ्या र्‍हासापासुन वाचवण्यास सुरुवात झाली आहे.

***

पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लोणारला हेरीटेज साईट बनविण्याचे. त्यासाठी बरेच जण काम करत आहेत. लवकरच त्यासाठीचे कार्यक्रम आखले जातील.

***

महाराष्ट्र टाईम्स: सदर=लोणारच्या शेवटाची सुरुवात? = http://goo.gl/mn005

First conference on conservation of Lonar Lake = http://goo.gl/MBXKl

Photographs: facebook page = Heritage Lonar = http://goo.gl/d6hy0

नवीन परग्रहाचा शोध

नासाच्या स्पिट्झर अवकाश दुर्बीणीचा वापर करून खगोलशास्त्रज्ञांनी एका नवीन ग्रहाचा शोध लावल्याचे मानले जात आहे. परग्रह म्हणजे आपला सूर्याव्यतिरीक्त इतर तार्‍याभोवती फिरणारा ग्रह. UCF-1.01 असे नाव देण्यात आलेला हा परग्रह आपल्या सूर्यमालेपासून ३३ प्रकाशवर्षे दूर असून आणि याचा आकार पृथ्वीच्या दोन तृतीयांश आहे. विषेश म्हणजे हा पृथ्वीपेक्षा लहान असलेला सर्वात जवळचा ग्रह असण्याची शक्यता वर्तवली आहे.

केवीन स्टिवेनस्टन यांच्या नेतृत्वाखाली लिहिलेल्या शोधनिबंधास अ‍ॅस्ट्रोफिजीकल जर्नलने मान्यता दिली आहे. “प्रचंड उष्ण आणि खुप जवळ असलेल्या या ग्रहाची आम्हाला चांगली निरीक्षणे मिळाली. अशा लहान आणि जवळच्या ग्रहांचा शोध लावल्याने भविष्यात आपलल्या त्यांच्या वैशिष्टयांची माहिती करुन घेता येइल.” असे सेंट्रल फ्लोरीडा विद्यापिठाशी संलग्नीत केवीन स्टिवेनस्टन म्हणाले.

अवकाशातील तारे, आकाशगगांनी उत्सर्जीत केलेल्या ३ ते १८० मायक्रोमीटर मधील इंफ्रारेड किरणांचा अभ्यास करण्यासाठी स्पिट्झर दुर्बीणीचा वापर केला जातो. पृथ्वीप्रमाणेच हि दुर्बिण आवकाशात सूर्याभोवती फिरते ( हेलीओसेंट्रिक कक्षा ). या दुर्बिणीचा उपयोग आधी लागलेल्या परग्रहांवर संशोधन करण्यासाठी स्टिवेनस्टन आणि त्यांचे सहकारी (red-dwarf) M dwarfs श्रेणीतील GJ 436 या तार्‍याभोवती फिरणार्‍या GJ 436b या नेपच्युन एवढ्या परग्रहाचा अभ्यास करीत होते. त्यावेळेस तार्‍याच्या इंफ्रारेड किरणांची प्रकाशमानता कमी-जास्त होण्याच्या नोंदी मिळाल्या. याचे कारण GJ 436b हा ग्रह नव्हता. प्रकाशातील फरक हा नियमित असल्याने तेथे इतर ग्रह असल्याची शक्यता वर्तवण्यात आली. UCF-1.01 आणि UCF-1.02 असे तेथील दोन ग्रहांना नावे देण्यात आली असून या शोधास पुष्टी मिळाल्यास त्यांना अनुक्रमे GJ 436c and GJ 436d अशी नावे देण्यात येइल. तरी यातील UCF-1.02 ग्रहाची पुरेशी माहिती शास्त्रज्ञांना अजुन मिळालेली नाही.

तार्‍याभोवती ग्रहाच्या परिभ्रमणामुळे निरिक्षकाला तार्‍याच्या प्रकाशमानतेत नियमित कमी-जास्तपणा जाणवतो. यास ग्रहणाचा एक प्रकार म्हणजे अधिक्रमण असे म्हणतात. नवीन ग्रहांचा शोध अशा अधिक्रमणांच्या निरिक्षांणांतून मिळालेल्या माहितीमुळे लागतो. अधिक्रमणाला लागणारा वेळ, प्रकाशाचे कमी झालेले प्रमाण यावरुन ग्रहाची प्राथमिक माहिती काढता येते, जसे की आकारमान, कक्षा. जर ग्रह आकारने लहान असेल आणि तार्‍याच्य जवळून परिभ्रमण करीत असेल, तर निरिक्षणे मिळणे फार जिकरीचे होते. नासाचा केप्लर मिशन हा उपक्रम परग्रहांचा शोध लावण्यासाठी प्रसिद्ध आहे. केप्लर अवकाश दुर्बीणीसुधा अधिक्रमणांचीच निरिक्षणे घेते. या उपक्रमात १८०० तार्‍यांची गणना केली आहे कि ज्यांना उपग्रह आहेत आणि यापैकी फक्त ३ तार्‍यांच्या ग्रहांचा  पृथ्वीच्या आकारमानाशी साधर्म्य आहे.

UCF-1.01 या उपग्रहाचा व्यास ८४०० कि.मी. आहे तर तेथील तापमान सुमारे ६०० अंश सेल्सिअस इतके प्रचंड आहे. हा ग्रह मुख्य तार्‍याच्या इतक्या जवळून फिरतो की त्याची एक फेरी पुर्ण होण्यास लागणारा वेळ म्हणजे परिभ्रमण काळ १.४ दिवस (पृथ्वीचा दिवस) इतका आहे.  उष्णतेमुळे भाजुन निघालेल्या या लहान ग्रहावर कधी काळी जर वतावरण असेल तर ते एव्हाना नक्कीच नष्ट झाले असणार आहे. या ग्रहांच्या शोधाची पुष्टी करण्यासठी त्यांची घनता मोजणे आवश्यक आहे परंतु अतिसंवेदनशील साधनांचा वापर करुनही मोजणी करणे सध्या अशक्य आहे कारण त्याची घनता फार कमी – संभवतः पृथ्वीच्या एक तृतीयांश आहे.

ग्रहावर जीव असण्याची शक्यता ही त्याच्या आणि तार्‍याच्या अंतरवर अवलंबुन असते. तार्‍यापासुन काही ठरावीक अंतरच्या क्षेत्राला habitable zone म्हणतात. ग्रह या zone असला तरच त्यावर जीवसृष्टी तयार होण्यास पुरक वातावरण, तापमान आणि पाणी असण्याची संभावना असते.

आपला सुर्य G-type तारा आहे आणि पृथ्वी habitable zone मधे आहे. GJ 436 हा तारा M dwarfs या श्रेणीतील आहे. या तार्‍यांची घनता सुर्याच्या घनते पेक्षा ८ टक्के ते ५० ट्क्के इतकी असते. अशा प्रकारचे तारे फार अंधुक असतात, साध्या डोळ्यांना न दिसणारे आणि आपल्या आकाशगंगेत त्यांची व्याप्ती ७० टक्के आहे. परजीवांच्या संशोधनाचा विचार करता अशा तार्‍याचा अभ्यास तुलनेने कमी केला जातो कारण यांचा habitable zone तुलनेने फ़ार अरुद असतो. हा zone तार्‍याच्या फ़ार जवळ असल्या कारण्याने धोकादायक radiation चा प्रश्न असतो.

आतापर्यंत habitable zone मधे असलेले क्त ५४ ग्रह सापड्ले आहेत.

 Paper Publication http://arxiv.org/abs/1207.4245

News release http://www.spitzer.caltech.edu/news/1441-ssc2012-11-Spitzer-Finds-Possible-Exoplanet-Smaller-than-Earth

M dwarf the search for life is on. Interview

http://www.astrobio.net/interview/1694/m-dwarfs-the-search-for-life-is-on